संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक संपन्न

 

गडचिरोली, दि.04:विशेष सहाय्य योजने अंतर्गत निराधार वृध्द व्यक्ती, अंध अंपग शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्तया, देवदासी महिला, अनाथ बालके आदींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनेच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य दिले जाते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोचविण्या करीता गडचिरोली तालुक्यातील महाराजस्व अभियान अंतर्गत जनजागृती करुन लाभार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज तलाठयां मार्फत भरुन घेण्यात येतात.

विशेष सहाय्य योजने अंतर्गत प्राप्त झालेले अर्ज दिनांक 30 डिसेंबर, 2022 रोजी संजय गांधी निराधार योजना समिती समोर ठेऊन समितीचे अध्यक्ष तहसिलदार, तहसिल कार्यालय, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजीत करण्यात आली. सदर सभेला मुख्याधिकारी, नगर परिषद गडचिरोली व संवर्ग विकास अधिकारी पं.सं. गडचिरोली हे शासकीय सदस्य उपस्थित होते.

सदर सभेत पुढील प्रमाणे अर्ज मंजुर/नामंजुर करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एकूण 21 प्राप्त प्रकरणे त्यापैकी 14 प्रकरणे मंजूर झाली असून 7 प्रकरणे नामंजूर झाले. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचे एकूण 5 प्रकरणे प्राप्त व पाचही प्रकरणे मंजूर झालीत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजनेचे 9 प्रकरणे प्राप्त त्यापैकी 6 प्रकरणे मंजूर व 3 नामंजूर. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे 12 प्रकरणे प्राप्त त्यापैकी 10 प्रकरणे मंजूर व 2 प्रकरणे नामंजूर झालीत.

 

तसेच वरिल आयोजीत सभेच्यावेळी नायब तहसिलदार, (सं.गां.यो) तहसिल कार्यालय, गडचिरोली डी. ए. ठाकरे, अव्वल कारकुन, एल. एम. अल्लीवार, महसूल सहाय्यक, कु. एस. व्ही. कोडापे व डाटा एन्ट्री ऑपरेटर कु. रजनी डोंगरे यांनी विशेष सहाय्य योजनेची प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य केले.

विशेष सहाय्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमानुसार सदर योजनेचा लाभ घेण्याकरीता पात्र लाभार्थ्यांचे अर्ज तहसिल कार्यालयात तलाठयांमार्फत सादर करणेबाबत तहसिलदार गडचिरोली, महेंद्र गणविर यांनी जाहिर आवाहन केले आहे.