जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध Ø अभ्यागतांनी 8329651110 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीच्या कामासाठी

आता दूरध्वनी क्रमांक उपलब्ध

Ø अभ्यागतांनी 8329651110 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर दि. 11 जानेवारी : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमितपणे मास्क लावणे, आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर न पडणे, एकाच ठिकाणी गर्दी न करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे आदी नियमांचे पालन करणे सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे शासकीय कामाने जिल्हाधिकारी कार्यालयात येणा-या नागरिकांची कामे सोडविण्यासाठी किंवा त्यांची अडचण जाणून घेण्यासाठी आता प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची गरज नाही. जिल्हा प्रशासनाने दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला असून अभ्यागतांनी तातडीच्या कामासाठी 8329651110 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

महसूल व वनविभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाच्या आदेशान्वये, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दि. 10 जानेवारी 2022 पासून निर्बंध लावण्यात आले आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत कुठल्याही महत्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना भेटण्यास बंदी घातलेली आहे. तरी, ज्या अभ्यागतांना अत्यंत तातडीच्या कामासाठी संपर्क करावयाचा असेल त्यांनी दर सोमवार, बुधवार व शुक्रवार या दिवशी दुपारी 12 ते 2 या वेळेत  8329651110 या दूरध्वनी क्रमांकावर व्हाट्सअप मेसेज तसेच व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी यांना भेटण्यास येणाऱ्या अभ्यांगतांनी सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे.