शाळा- महाविद्यालये आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात यावी – जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न

शाळा- महाविद्यालये आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात यावी – जिल्हाधिकारी

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न

भंडारा दि 4 : तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असून जिल्ह्यातील वैद्यकीय सोयी-सुविधा अद्ययावत करण्यात याव्यात. संभाव्य प्रसाराचा वेग पाहता जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये कोविड केअर सेंटरसाठी घेण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज ‍जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत दिले.

या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, जिल्हा‍ माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रियाज फारूकी यांच्यासह कार्यकारी अभियंता विरलाणी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यात ऑक्सिजन उपलब्धता पुरेशा प्रमाणात असून कोविड केअर सेंटर व क्वारंटाईनबाबत चर्चा करण्यात आली. मायक्रो कन्टेंन्मेंट झोनचे अधिकार ग्रामीण भागात उपविभागीय अधिकारी व नगरपरिषद क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यात्रा बंदी करण्याविषयी चर्चा करण्यात आली. कोरोना नियंत्रणासाठी खनिकर्म व जिल्हा नियोजनमधून निधीची आवश्यकतेनुसार मान्यता घेण्यात येईल. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह अनुदानासाठी 101 प्रकरणांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंजुरी दिली.