आपल्या पाल्यांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करा Ø ब्रम्हपुरी येथून जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ

आपल्या पाल्यांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करा

Ø ब्रम्हपुरी येथून जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, दि. 3 जानेवारी : जापनीज इन्सेफेलायटीस (मेंदूज्वर) या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यु होतो. कोवळी बालके या आजाराला बळी पडतात. याची दखल घेवून बालकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या 1 ते 15 वयोगटातील बालकांना मेंदूज्वर प्रतिबंधात्मक लस देवून सुरक्षित करावे, असे आवाहन राज्याचे  केले.

ब्रह्मपुरी येथे ने.ही. उच्च माध्यमिक विद्यालयात जॅपनीज इन्सेफेलायटिस या जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना ते बोलत होते.  यावेळी नगराध्यक्षा रिता ऊराडे, जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, स्मिता पारधी, प्रभाकर सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. खिल्लारे, शाळेचे प्राचार्य गजानन रणदिवे, उपमुख्याध्यापक कपूर नाईक, विलास विखार आदी उपस्थित होते.

जॅपनीज इन्सेफेलायटिस (जे.ई.) या रोगामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. वडेट्टीवार म्हणाले, 1 ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना मेंदूज्वरची लस घेणे आवश्यक आहे. आपली सुरक्षितता आपल्या हातात असून लसीपासून कोणताही धोका नाही. त्यामुळे 1 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांनी ही लस आवर्जून घ्यावी. दरवर्षी जवळपास 40 हजार बालकांना मेंदूज्वर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही लस टोचून घेतली तर मेंदूज्वर होणार नाही व आपण सुरक्षित राहू.

शासनाने ही मोहीम सुरू केली असून आजपासून या मोहिमेचा शुभारंभ झाला आहे असे जाहीर करून पालकमंत्री पुढे म्हणाले, धानाचे उत्पादन करताना निर्माण होणारे जे डास असतात ते चावल्याने मेंदुज्वर होण्याची शक्यता असते. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे धान उत्पादक जिल्हे आहे. बालकांना मेंदुज्वर होणार नाही याची काळजी सरकारने घेतली असून सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. तत्पुर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून लसिकरण कक्षाचे उद्धघाटन करण्यात आले.

 जॅपनीज इन्सेफेलायटिस (मेंदुज्वर) हा आजार प्रामुख्याने 15 वर्षाखालील मुलांमध्ये प्रामुख्याने आढळून येणारा विषाणूजन्य आजार आहे. जे.ई आजाराचा विषाणू माणसाच्या शरीरामध्ये क्युलेक्स डांसामार्फत प्रवेश करतो

व त्यांनतर विविध लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. या आजारामुळे रुग्णांमध्ये 30 टक्के रुग्ण मृत्युमुखी पडतात. तर 40 टक्के रुग्णांमध्ये मेंदुच्या पेशी मृत झाल्यामूळे कायमचे शारीरिक व मानसिक अपंगत्व येऊ शकते. त्यामूळे 15 वर्षाच्या आतील वयोगटात अपंगत्व येण्याचे प्रमाण जास्त असते.

चंद्रपूर जिल्ह्यात 1 ते 15 वयोगटातील शहरी तथा ग्रामीण भागातील 3 लक्ष 56 हजार 313 व चंद्रपुर महानगर पालीका क्षेत्रातील 76 हजार 25 असे जिल्हातील एकूण 4 लक्ष 32 हजार 338 सर्व मुलां-मुलींना लसिकरण करण्याचे उदिष्टय आहे. ब्रम्हपूरी तालूक्यात 36 हजार 945 मुलां-मुलींना लसीकरणाचे करावयाचे असल्याने जॅपनिज एन्सेफलायटीज (जे.ई) लसिकरणामूळे मेंदूज्वर या आजारापासून बालकांचे संरक्षण होणार आहे.

या लसिकरणामुळे जे.ई (मेंदूज्वर) या आजारापासून बचाव करण्यास मदत होणार आहे. यापूर्वी हि लस पाल्यांना लावली असेल तरीसुध्दा या अभियान कालावधीमध्ये हि लस देणे आवश्यक आहे. या लसीचा कुठलाही दृष्यपरिणाम होणार नाही.