लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या तालुक्यांना भेटी Ø बल्लारपूर येथे घेतला यंत्रणेचा आढावा

लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या तालुक्यांना भेटी

Ø बल्लारपूर येथे घेतला यंत्रणेचा आढावा

मिथुन मेश्राम सिन्देवाही 9923155166

      चंद्रपूर  : जिल्ह्यात दुस-या डोजचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हास्तरावरून नियमित आढावा घेण्यात येत असला तरी प्रत्यक्षात तालुका यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी तालुक्यांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. पहिल्या दिवशी चिमूर उपविभागात विविध ठिकाणी भेटी दिल्यानंतर जिल्हाधिका-यांनी आता बल्लारपूर येथे लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला.

            बल्लारपूर येथील उपविभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीला उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी, तहसीलदार संजय राईंचवार, सहा. मुख्याधिकारी,  जयवंत काटकर, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, गटशिक्षणाधिकारी श्री. लहामगे, सर्व नोडल अधिकारी तथा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा नव्या व्हेरींयटचा वाढता प्रसार लक्षात घेता शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरीकांचे  लसीकरण पुर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी तालुक्यातील नागरीकांच्या लसीकरणाबाबतची माहिती जाणून घेत तालुक्यांनी त्यांच्या क्षेत्रातील नागरीकांचे 100 टक्के लसीकरण येत्या 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी तालुका प्रशासनाला दिले. संबधित तालुक्यातील नागरीकांचा झालेला पहिला व दुसरा डोज तसेच अद्याप लसीकरण न झालेल्या नागरीकांची माहिती प्रत्येक दौ-यात ते जाणून घेत आहेत.

शहरातील नागरिकांचे लसीकरणासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबतची  माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.गजानन मेश्राम यांनी तर ग्रामीण भागातील 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या नियोजनाबाबत सविस्तर माहिती बल्लारपूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिली.  दि. 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याच्या संदर्भातील माहितीसुध्दा त्यांनी जाणून घेतली.